औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुख्यतः शेतकऱ्यांसाठी काम करणारी बँक आहे. त्यामुळे शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यात बँकेने मोठी आघाडी घेतली आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक पीककर्ज वाटप आम्ही करणार आहोत. सध्या ६५ ते ७० टक्के कर्जवाटप झालेले आहे. याकामी जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांचे बँकेला नेहमीच सहकार्य मिळत असते.
शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणे ही आमची सेवा आहे. यातून बँकेला कुठलाही नफा मिळत नाही. नफा मिळविण्यासाठी अकृषिक कर्जवाटपासाठी ३५० कोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. वैयक्तिक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. त्याची मर्यादा दहा लाखांवरून पंधरा लाख करण्यात आली आहे. दुकानदार व छोट्या व्यावसायिकांसाठी कॅश क्रेडिट सुरू करण्यात आली आहे. वाहन व गृह कर्जातून बँकेला नफा मिळतो. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेसाठीच्या जागांचे भाडे देता येते.
नाबार्डच्या सहकार्याने सध्या सर्व शाखांमध्ये मायक्रो एटीएम सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी पोखरा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ कामाला लागले आहे.