बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढून घेण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर ५३६ अधिक डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून पेरणीस प्राधान्य दिले. आतापर्यंत सुमारे ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडावे यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त विमा कंपनीमार्फत पीकविमा काढता येणार आहे. चालू हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा थेट कपात करण्यात येणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडे पीकविम्यासाठी अर्ज सादर करताना सातबारा, पीकपेरा पत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. कृषी विभागाने खाजगी कंपनीच्या माध्यमातून तालुका व गाव पातळीवर सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आॅनलाइन पीकविमा भरता येणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर उपलब्ध विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती आॅनलाईन भरल्यानंतर विम्याचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कपात करण्यात येणार आहे. पीकविमा भरणा झाल्यानंतर तसा संदेश शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर भरता येणार पीकविमा
By admin | Published: July 15, 2017 12:44 AM