हिंगोली : भानामती करण्याच्या कारणावरून महिलेसह तिघांना काठ्या- कुऱ्हाडीने मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून तीन आरोपींना एक वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर मुक्तता करून प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला आहे. हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला.हिंगोली शहरातील महादेववाडी भागात १ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुमन मारोती धुमाळ (३५) या महिलेच्या मुलासह जावूस काठी व कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. भानामती करण्याच्या कारणावरून घरावर दगडफेक करून शिवीगाळही करण्यात आली. या प्रकरणी आरोपी संतोष विश्वनाथ हतागळे, छाया पाराजी मंडलिक, अनिता विश्वनाथ हातागळे, देवानंद यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन जमादार कऱ्हाळे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.या खटल्याचा निकाल देताना न्या. जी.डी. निर्मले यांनी आरोपी संतोष विश्वनाथ हतागळे, छाया पाराजी मंडलिक, अनिता विश्वनाथ हातागळे यांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला. तसेच एक वर्षे चांगले राहण्याचे बंधपत्र देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल इंगळे यांनी काम पाहिले. यातील आरोपी देवानंद हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध ज्युवेनाईल कोर्टात स्वतंत्रपणे खटला चालविण्यात आला. (प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी ३ आरोपींना दंड
By admin | Published: September 02, 2014 12:51 AM