औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एका याचिकेवर सुनावणी चालू असताना न्यायालयीन कामकाजाचे ‘व्हिडीओ चित्रीकरण’ करणारे डॉ. विक्रम श्रीधरराव देशमुख यांना न्या. रवींद्र व्ही. घुगे यांनी ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम २५ सप्टेंबरपर्यंत खंडपीठात जमा न केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘उच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई’ केली जाईल, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.नांदेड जिल्ह्यातील गंगाबाई रामराव कप्पावार यांच्या पतीने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंगाबाईला सरपंचपदी अपात्र घोषित केले होते. रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी १२ सप्टेंबर २०१९ ला ‘विशेष बैठक’ आयोजित केली होती. म्हणून गंगाबाई यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली होती. खंडपीठाने न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर ११ सप्टेंबरला सुनावणी घेतली.सुनावणी चालू असताना एक व्यक्ती मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करीत असल्याचे बेन्च क्लर्कने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने तत्काळ मोबाईल ताब्यात घेऊन त्यातील व्हीडीओ चित्रीकरण तपासले. सदर व्यक्ती हा याचिकाकर्तीच्या पतीचा मित्र डॉ. विक्रम श्रीधरराव देशमुख असल्याचे त्याने खंडपीठास सांगितले व त्याचे आधार कार्ड सादर केले. खंडपीठाने त्याला ७ दिवस कारावास किंवा एक लाख रुपये दंड भरण्याची तयारी आहे काय, असे त्याच्या वकीलामार्फत विचारले. डॉ. देशमुखने पुन्हा चूक कबूल करुन क्षमा याचना केली. तसेच ५० हजार रुपये दंड भरण्याची तयारी दर्शविली.
न्यायालयीन कामकाजाचे चित्रीकरण करणाऱ्याला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 4:29 AM