औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल १२ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांचे पथदिव्यांकडे अजिबात लक्ष नाही. कंत्राटदारांकडून काम करून घेण्यास विद्युत विभागाचे अधिकारी कमी पडत आहेत. काम न करणाऱ्या कंत्राटदारांना दररोज आर्थिक दंड लावा, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले.शनिवारी सकाळी आयुक्तांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. विद्युत, सर्व अभियंते, आरोग्य आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. सर्वप्रथम विद्युत विभागाच्या कामकाजाची माहिती आयुक्तांनी घेतली. शहरात अनेक रस्त्यांवर दिवसा पथदिवे सुरू असतात. रात्री बंद असतात. अनेक रस्त्यांवर रात्री पन्नास टक्के पथदिवे बंद असतात. कोट्यवधी रुपये खर्च करून देखभाल, दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार करतात तरी काय, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. विद्युत विभागाचे अधिकारी निरुत्तर होत होते. आयुक्तांनी ठोस भूमिका घ्यावी, असे आदेशित केले. काम न करणाऱ्या कंत्राटदारांना दंड लावावा, असेही यावेळी सांगण्यात आले.
पथदिव्यांच्या कंत्राटदारांना दंड लावा
By admin | Published: July 24, 2016 12:22 AM