औरंगाबाद : कोरोनामुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे महापालिकेने जुलै ते सप्टेंबर-२१ या तीन महिन्यांपर्यंत मालमत्ता करावर आकारला जाणारा दोन टक्के दंड न लावण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे मालमत्ताधारकांना किंचित दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आर्थिकरीत्या संकटात सापडले. त्यामुळे नागरिक, व्यापारी संघटनेने मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती रद्द करण्याची मागणी मनपाकडे केली होती. याचा विचार करून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ही सूट दिली. या निर्णयामुळे मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
चौकट
वेळेत कर भरल्यास मिळते सूट
मालमत्ता कराची आकारणी १ एप्रिलपासून केली जाते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कराचा भरणा केल्यास त्यावर दहा टक्के सूट मिळते. मे महिन्यात कर भरल्यास ८ टक्के सूट तर जून महिन्यात कराची रक्कम भरली, तर त्या रकमेवर ६ टक्के सूट दिली जाते. या तीन महिन्यांत कोणतीही शास्ती आकारली जात नाही.
शहरात २ लाख ७० हजार मालमत्ताधारक
शहरात २७ हजार व्यावसायिक मालमत्ताधारक असून, २ लाख ४३ हजार मालमत्ताधारक हे निवासी आहेत. शुक्रवारी मनपा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा शहरातील २ लाख ७० हजार मालमत्ताधारकांना होणार आहे. मालमत्ताधारकांनी नियमित कराचा भरणा करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले.