लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डात पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर ओरड सुरू आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-६ भागातील मथुरानगरात पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी चक्क एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरच दोन तास हल्लाबोल केला. संतप्त नागरिकांनी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबवून घेतला. शुक्रवारी गुलमोहर कॉलनी भागातील नागरिकांनी आंदोलन करून स्वत: व्हॉल्व्ह फिरवून पाणी सोडले होते.शहरासह सिडको-हडकोत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या लहरीपणाला नागरिक आता जाम कंटाळले आहेत. उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याची ओरड सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही मनपाचा पाणीपुरवठा विभाग ठोस उपाययोजना करायला तयार नाही. उलट शहरात कृत्रिम पाणीटंचाई जास्तीत जास्त कशी होईल, यावर अधिकारी सर्वात जास्त लक्ष देत आहेत.मनपाच्या या भोंगळ कारभाराला वैतागलेल्या नागरिकांचा संयम हळूहळू सुटत आहे. याचा प्रत्यय शनिवारी सकाळी आला. एन- ६ मथुरानगरला शनिवारी सकाळी सहा वाजता पाणी देण्याची वेळ होती. आठ वाजले तरीही पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. येथे एकानंतर एक टँकर भरण्यात येत होते. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे गेट लावून नागरिकांनी टँकरचा पाणीपुरवठा बंद केला. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. अधिकाऱ्यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. दोन दिवसाआडच पाणी देण्यात यावे, पाणी वेळेवरच द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या . आंदोलनात निर्मला घाटगे, इंदूबाई बोराडे, इंदूबाई शिसोदे, मंगल चौधरी, रामकला पळसकर, कविता शिंदे, अंजली शिंदे, प्रियांका मात्रे, संध्या खरे या महिलांसह मधुकर वाघमारे, चेतन सिंगट, डी. के. बनकर, राम कोंडके, चंद्रसिंग पाटील सहभागी झाले होते.
औरंगाबादेत नागरिकांचा पाण्याच्या टाकीवर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:43 AM