औरंगाबाद : सगळे जग एलसीडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही शोधात असताना गल्ले बोरगावचे गावकरी मात्र जुन्या काळी मिळणाऱ्या लाकडी शटरच्या ब्लॅक ॲन्ड व्हाईट टीव्हीच्या शोधात फिरत आहेत. याला करणही तसेच गमतीदार आहे. या टीव्हीमध्ये सापडणारी लाल रंगाची छोटी डबी एक कोटी रूपयांत विकली जात असल्याचे गावकऱ्यांना कुणीतरी सांगितले आणि तेव्हा पासून जुन्या टीव्हीचा शोध सुरू झाला.
गेल्या काही आठवड्यापासून गल्ले बोरगाव येथील नागरिकांचा हा रंजक शोध सुरू आहे. जुन्या टीव्हीसाठी काही जण चक्क लाख- लाख रूपये देण्यासही तयार झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भंगार दुकानातही चकरा सुरू झाल्या असल्याचे समजते.
जुन्या टीव्हीला आताच मागणी कशी आली, या लाल डबीचा शोध आताच कसा लागला, खरंच त्या डबीची किंमत १ कोटी आहे का, ती चीप सापडली तरी ती कोण विकत घेणार, या प्रश्नांची उत्तरे गावात कोणालाच माहिती नाहीत. पण तरीही गावकऱ्यांचा जुन्या टीव्हीचा शोध मात्र अविरतपणे सुरू आहे.