मंठा : मंठा तालुक्यातील किर्ला येथे सुरु असलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात २७ जानेवारी रोजी शाहीर आप्पासाहेब उगले यांच्या महाराष्ट्राचा लोकरंग या कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली. मराठवाड्यात लोप पावत चाललेली सांस्कृतिक चळवळ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने किर्ला गावात तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव सुरु करुन सांस्कृतिक चळवळीला नव्याने उजाळा दिला. शाहीर आप्पासाहेब उगले यांच्या महाराष्ट्राचा लोकारंग या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेली गवळण, भारुड, गोंधळ, लावणी, पोवाडा, बतावणी, वासुदेव, पोतराज सादर करुन श्रोते-रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील हजारो श्रोत्यांनी लाभ घेतला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा सरचिटणीस अनिल खंदारे, सरपंच प्रिती खंदारे, शेषराव राठोड, नितीन चव्हाण, अनिल बांडगे, आबाराव चव्हाण, शिवाजी देशमुख, विजय चव्हाण, शंकर बांडगे, यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. यातील अनेक कार्यक्रमांना वन्समोअरचा गजर रसिकांनी केला.
महाराष्ट्राच्या लोकरंगने रसिकांची मने जिंकली..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 11:56 PM