औरंगाबाद : नागपूरमध्ये दोन विचार आहेत. एक विचार संघाचा आणि दुसरा दीक्षाभूमीचा. संघाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मला मिळाले. माझा आजही दावा आहे की, संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. मी इतका कडवा बोलतो की, माझ्यापाठीमागे कोण कोण लागतील, असा प्रश्न आहे. अलीकडे ईडी आहे. कारण असे बोलणारे लोक चालत नाही; पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या वारशासोबत जगतो, असे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत म्हणाले.
‘पीईएस’च्या नागसेनवनातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात डाॅ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू के. व्ही. काळे हे अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अभिजित वाडेकर, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. डी. राठोड, मिलिंद मल्टी पर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. वाय. टिळक, मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, मिलिंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री घोबले, प्रकाश मुगदिया, नामदेव पवार यांची उपस्थिती होती.
लोडशेडिंगच्या संकटात येथून ऊर्जा घेऊन जाणारडाॅ. राऊत म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले ऊर्जामंत्री आणि मी राज्याचा ऊर्जामंत्री. राज्यात सध्या लोडशेडिंगचे संकट आहे. अशा वेळी येथून ऊर्जा घेऊन जाण्याचे काम मी करणार आहे.
भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीचे दर्शन घ्यावेकाही लोक भाेंगे बंद करा म्हणत आहेत. मी शिर्डीत जाऊन आलो. तेथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक येतात. भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीत जाऊन दर्शन घ्यावे, असा टोलाही डाॅ. राऊत यांनी लगावला.