औरंगाबाद- संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी संजय पवार यांचं नाव जाहीर केलं.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र त्यांना संधी न देता संजय पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं. त्यानंतर आज चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय पवारसुद्धा जुने आणि कडवट शिवसैनिक आहेत, असं ते म्हणाले. एक मजबूत शिवसैनिकाला संधी दिल्याने आम्हाला याचा अभिमान आहे. त्यामुळेच मी उद्धव ठाकरेंच अभिनंदन आणि कौतुक करेल. आपल्या नशिबात जे असतं ते होईल. माझ्या मनात काहीच किंतु-परंतु नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंचा आदेश आम्हाला मान्य आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, मी जरी आज खासदार नसलो तरीही मी खासदारपेक्षा अधिक काम करतो. माझ्यासमोर हे कुणीही काम करत नाही. अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. लोक मला खासदार म्हणतात, त्यामुळे मी सुद्धा खुश आहे. तसेच पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीच काही वचन मिळाले का? असा प्रश्न विचारताच हे इथं सांगायचं नसतं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव जाहीर केल्यानंतर आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उद्या दुपारी एक वाजता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
मोठा बहुमान असल्याची शिवसेनेची भावना-
संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.