कन्नड (औरंगाबाद ) : उष्णतेचा पारा ४४ अंशांवर पोहोचला असताना कन्नड तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे येथील बहुतांश गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक गावांत पाण्याचे टँकर मंंजूरही झाले आहेत. मात्र, तरीही टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने दखल घेऊन त्वरित टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
कन्नड तालुक्यात वाढणाऱ्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी, विहिरींनी तळ गाठला असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये म्हणून प्रशासनही पाहणी करून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशही देत आहेत. मात्र, टँकर पुरवठादाराकडून टँकर पुरविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत असून पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ नागरिकांसह महिलांवर आली आहे.
तालुक्यातील आठेगाव, शिवराई, दिगाव, शेलगाव, दहिगाव, आडगाव (पि.), मोहरा, आमदाबाद मोहाडी, सासेगाव, बरकतपूर, रायगाव, रुईखेडा, जवळी खुर्द व जवळी बु., कानडगाव (क.), देवळी, गणेशपूर, पिंपरखेडा ग्रामपंचायतींतर्गत पिंपळवाडी, सपकाळवाडी, पिंपरखेडा, सफियाबाद, नाचनवेल, कोपरवेल, जवखेडा खुर्द, शेवता, निपाणी, गव्हाली, ताडपिंपळगावअंतर्गत गाडीवस्ती लोहगाव, निमडोंगरी, बनशेंद्रा, सारोळा, देवगाव रंगारी, देवगाव रंगारी ग्रामपंचायतींतर्गत खोतवाडी, माळेगाव ठोकळ, जामडी (ज.), वाकद, चापानेर, डोणगाव, विठ्ठलपूर, कविटखेडा, देवळाणा, जवखेडा बु., सिरजापूर व शिरजापूर तांडा, डोंगरगाव, रेल व रेलतांडा, कनकावतीनगर, गौतमनगर, वडोद, बिबखेडा, जैतापूर, लंगडातांडा, भांबरवाडी, चांभारवाडी, देवपुडी, हतनूर, आदर्श वसाहत, माटेगाव, बोलटेक, बोलटेक तांडा, रोहिला खुर्द या गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी मंजूर झालेले टँकर येत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मंजूर झालेले टँकर त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टँकर द्या हो, नागरिकांचा टाहो च्कन्नड तालुक्यातील मेहेगाव, बहिरगाव व चिखलठाणअंतर्गत गोपाळवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वीच देऊनही टँकर उपलब्ध झालेले नाहीत, तर शिपघाट, ठाकूरवाडी, हिवरा वाडी, लामणगाव, धारण खेडा, नेवपूरअंतर्गत एकलव्य वस्ती येथील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल आहेत. दिवसेंदिवस टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत आहे. पुढच्या महिन्यात अधिक तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.