दर्पण दिनानिमित्त दि. ६ रोजी एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सकाळच्या सत्रात वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी यांनी तर सायंकाळच्या सत्रात कुमार केतकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सायंकाळच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. रेखा शेळके यांचीही विशेष उपस्थिती होती.
यादरम्यान केतकर यांनी ‘बदलती पत्रकारिता - नवी दिशा, नव्या अपेक्षा’ हा विषय मांडला. ते म्हणाले की, तंत्रज्ञान आणि सत्ताकारण यामुळे माध्यमांवरचा दबाव प्रचंड वाढलेला आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यापेक्षा आता सोशल मीडिया ही वेगळ्या प्रकारची लोकाभिमुखता आली असून सामाजिक, राजकीय एकत्रीकरणाचे साधन आता मोबाइल झाला आहे. सोशल मीडियाच्या प्रचंड ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. फक्त त्याचा योग्य दिशेने वापर करणे अतिशय गरजेचे झाले आहे.
त्यामुळे आजच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना नुसते तंत्रज्ञान शिकवून उपयोग नाही, तर माध्यमातून काय साधता येईल हे शिकविण्याची आणि साधता आले नाही तर काय दुर्दशा होईल, हे सांगण्याची गरज आहे. सोशल मीडियातून नुसतेच व्यापाऱ्यांचे, भांडवलाचे जागतिकीकरण होण्यापेक्षा लोकांच्या भावनांचे, सद्भावनांचे जागतिकीकरण झाले पाहिजे. सोशल मीडियातून नवा विचार देणे नव्या पिढीच्या हातात आहे. ते संकुचित झाले तर सामाजिक, सांस्कृतिक जागतिकीकरण शक्य नाही, असेही केतकर यांनी सुचविले.