छत्रपती संभाजीनगर : कार-दुचाकी अपघातात ठार झालेल्या शिक्षकाच्या वारसांना १ कोटी ५ लाख रुपये नुकसानभरपाई विमा कंपनीने द्यावी, असे आदेश राष्ट्रीय लोकन्यायालयाने दिले.
गोरक्ष शिक्षण संस्थेच्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील गणेश विद्या मंदिर येथे गणेश विठ्ठल काटकर हे सहशिक्षकपदी कार्यरत होते. २३ जुलै २०२१ रोजी ते जळगाव रोडने मोपेड दुचाकीने जात असताना पाल फाट्याजवळ कारने त्यांना जोराची धडक दिली होती. या घटनेत ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले होते. या घटनेनंतर त्यांच्या वारसांनी ॲड. संतोष पी. पाथरीकर आणि ॲड. गजानन आर. व्यवहारे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात विमा कंपनी आणि कारमालकाविरोधात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता.
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हे प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मृत काटकर यांचे वय, मृत्यूसमयी त्यांना मिळणारे वेतन आणि नोकरीचा राहिलेला कालावधी, त्यांच्यावर अवलंबून वारस, नोकरीच्या काळात त्यांचा वाढणारा पगार आणि बढती आदी बाबींचा विचार करून नुकसानभरपाई देण्याची विनंती काटकर यांच्या वकिलांनी न्यायालयास केली होती. अर्जदारांचे म्हणणे विचारात घेऊन फ्यूचर जनरल विमा कंपनीने आदींचा विचार करून नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले.
लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणवीस, पॅनल सहायक न्यायाधीश ए.आर. उबाळे, पंच ॲड. एस.के. बरलोटा यांच्यासमोर विमा कंपनीने काटकर यांच्या वारसांना लगेच १ कोटी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. ही तडजोड करण्यासाठी विमा कंपनीचे विधि अधिकारी उमाकांत शिरसाट, उपविधि अधिकारी संतोष मोरे यांनी पुढाकार घेतला. ॲड. मंगेश एस. मेणे यांनी विमा कंपनीच्या वतीने काम पाहिले.