औरंगाबाद : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने रविवारी रणनीती आखणारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील असुविधांविरोधात जनआंदोलन करण्याचा प्राथमिक निर्णय झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून समजली आहे.
जिल्हा परिषद व मनपा निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होतील की नाही हे सांगता येत नाही; परंतु या निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी भाजपने इच्छुकांसह संघटना पदाधिकाऱ्यांमधील चैतन्य कायम ठेवण्यासाठी तयारी म्हणून बैठक घेतली. उस्मानपुरा येथील पक्षाच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीत भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. बैठक गोपनीय होती, त्यामुळे त्याबाबत फारशी माहिती कुणालाही देण्यात आली नव्हती.
ग्रामीण भागातील रस्त्यांसह पाणीपुरवठा, महावितरणकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आदी मुद्दे आहेत. तर शहरात अनियमित पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वॉर्डनिहाय अंतर्गत रस्त्यांसह गुंठेवारी नियमितीकरण शुल्काचे मुद्दे आहेत. यात गुंठेवारी वसाहतींत नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या रकमेविरोधात भाजपने मोर्चाचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोव्हेंबरमध्येच मोर्चा काढण्यात येणार होता; परंतु त्यावेळी शहराध्यक्षांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्यामुळे मोर्चाचे नियोजन झाले नाही. आता हा मोर्चा नवीन वर्षांत काढण्याची तयारी करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेतून मनपा निवडणुका होणार असल्यामुळे भाजपला सत्तेपर्यंत जाण्याचे समीकरण कसे जुळविता येईल, यासाठी इच्छुक उमेदवारांशी रविवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन वर्षात भाजप शहर व ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणार असून, त्यासाठी पक्षाच्या शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे.