घाटनांद्रा : घाटनांद्रासह परिसरात यंदा सुमारे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी नगदी पैसे मिळवून देणाऱ्या पूर्वहंगामी मिरची पिकाची लागवड केली आहे. सध्या लागवड केलेल्या मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन निघत असल्याने बाजारात हिरव्या मिरचीचे भाव घसरले आहेत. यामुळे घाटनांद्रासह परिसरातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
घाटनांद्रा परिसरातील शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी मिरची पिकाची लागवड करतात. याहीवर्षी शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून हातात दोन पैसे अधिक मिळतील, या आशेने मिरची पिकाची लागवड केली. पीकही चांगले वारेमाप झाले. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी मिरचीला चांगला भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; परंतु जसजसे मिरची उत्पादनात वाढ होऊ लागली आहे, तसे भावदेखील कोसळू लागले आहेत. तीन ते चार हजार रुपये भाव असलेली पूर्वहंगामी मिरची सातशे ते आठशे रुपये क्विंटलने व्यापारी खरेदी करू लागले आहेत.
---