औरंगाबाद : घर खरेदी करताना ते महिलेच्या नावावर रजिट्री केली तर मुद्रांक शुल्क दरात १ टक्का सवलत दिली जात आहे. या संधीचे सोने करीत आता महिलांच्या नावावर घराची रजिस्ट्री केली जात आहे.
घर खरेदी म्हटले की, घरातील पुरुषालाच प्राधान्य दिले जाते. परिणामी, शक्यतो घरखरेदी, मालमत्ता खरेदीही पुरुषांच्याच नावे होते. मात्र, घरातील महिलेलाही समानता, सन्मान मिळाला पाहिजे. घर खरेदीतील महिलांचा टक्का वाढविण्यासाठी राज्य सरकाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२१ रोजी महिलांना मोठे गिफ्ट दिले. महिलांच्या नावावर कोणी घर खरेदी करीत असेल तर मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत देण्यात येईल. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. या राज्य सरकारच्या निर्णयाचे बांधकाम व्यावसायिक व महिलावर्गातून मोठे स्वागत झाले. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत ही सवलत लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मुद्रांक शुल्क दरात देण्यात आलेली सवलत १ एप्रिलपासून बंद झाली. आता महिलांसाठी १ टक्का सवलत योजना सुरू आहे. शहरात ७ टक्के मुद्रांक शुल्क लागू होते; पण महिलेच्या नावावर रजिस्ट्री असेल तर ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे. यामुळे आता रजिस्ट्रीत महिलांचा टक्का वाढला आहे. याचाही बांधकाम क्षेत्राला फायदा होत आहे. यामुळे घर खरेदीदारांनी या योजनेचा नक्कीच फायदा करून घ्यावा, असे आवाहन बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे.