भारत दाढेल, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांना ऐनवेळी स्थायी समितीवर डावलून पदाधिकाऱ्यांनी शह दिल्यामुळे बेटमोगरेकर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्हा परिषदेवर अडीच वर्ष राज्य गाजविलेल्या बेटमोगरेकर यांनी स्थायीद्वारे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याची व्युहरचना केली होती़ मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनीच मनसुबे उधळून लावले़ आता बेटमोगरेकर यांच्या हस्तक्षेपाचे ‘बेट’ सर्वसाधारण सभेपुरतेच उरले आहे़ स्थायी समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मोहनराव पाटील टाकळीकर, माजी शिक्षण सभापती संजय कऱ्हाळे व काँग्रेसचे रोहिदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ स्थायी समितीच्या तीन सदस्यांसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते़ सर्वसाधारण सभेत अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला़ तेव्हा प्रवीण पाटील चिखलीकर, गणेश सावळे यांनी अर्ज मागे घेतले़ त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसच्या एकाची स्थायीवर निवड करण्यात आली़ या निवडीपूर्वी दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नावाची चर्चा होती़ मात्र स्थायी समितीत बेटमोगरेकर यांचा प्रवेश रोखण्यात आला़ बेटमोगरेकर अध्यक्षपदी असताना विषय समित्यांवरील नियुक्तीचे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले होते़ त्यामुळे या समित्या रखडल्या होत्या़ न्यायालयातील वाद संपुष्टात आल्यानंतर बेटमोगरेकर यांनी स्थायी समितीसाठी प्रयत्न चालविले होते़ बेटमोगरेकर यांनी अध्यक्षपदी असताना आपला थाट जिल्हा परिषदेत निर्माण केला होता़ तो थाट आताही राहावा, यासाठी त्यांचा अट्टाहास कायम आहे़ सर्वसाधारण सभेतील त्यांची उठाठेव वाढत असल्याने व सभेचा रिमोट आपल्या हाती घेऊन वर्चस्व निर्माण करण्याची त्यांची तऱ्हा सध्या जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय ठरली आहे़ कोणत्याही विषयावर आक्रमक भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेणाऱ्या बेटमोगरेकर यांच्यामुळे पदाधिकाऱ्यांनाही काम उरले नव्हते़ त्याचा परिणाम बुधवारच्या सभेत बेटमोगरेकर यांना एकटे पाडण्यावरून झाला़ या विषयाची चर्चा आज जि़ प़ त ऐकण्यास मिळाली़
स्थायीचे ‘बेट’ लागले ना हाती
By admin | Published: February 18, 2016 11:37 PM