औरंगाबाद : गर्भातील बाळामध्ये व्यंग असल्यास गर्भपाताची परवानगी असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज औरंगाबाद खंडपीठाने दिला. खंडपीठात दाखल एका याचिकेत वैद्यकीय अहवालानंतर न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जे. अवचट यांनी हा निकाल दिला.
रंजना शिवनारायण नागरे यांनी गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यात सोनोग्राफी केली असता गर्भात व्यंग असल्याचे लक्षात आले. यावरून डॉक्टरांनी त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला. परंतु, यावर न्यायालयाची परवानगी लागेल असेही सांगितले. यावरून नागरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली व सदरील गर्भपात करण्याची परवानगी मागीतली. खंडपीठाने यावर शासकीय रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल मागवला. अहवाल सकारात्मक आल्याने न्यायालयाने त्यांना गर्भपात करण्याची परवानगी दिली.