औरंगाबाद : घाटी रुग्णालयात ऑक्सिजन घेऊन येणारा टँकरचालक प्रशिक्षित असेल तरच टँकमध्ये ऑक्सिजन भरण्याची मुभा दिली जात आहे. त्यासाठी टँकरचालक प्रशिक्षित आहे की नाही, हे घाटीतील ऑक्सिजन पथकाकडून पडताळले जात आहे. त्याबरोबर आता ऑक्सिजन टँकच्या परिसरात देखरेखीसाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आला आहे.
नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. औरंगाबादेत कोरोनाचे सर्वाधिक गंभीर रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल आहेत. येथे लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्याचे काम, जो ऑक्सिजन घेऊन येतो तो टँकरचालकच करतो. याविषयी ‘लोकमत’ने २२ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत घाटी प्रशासनाने टँक आणि ऑक्सिजन भरण्याच्या कामात अधिक सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे. मेडिसीन विभागातील टँकजवळ यापूर्वी कोणताही कर्मचारी राहत नसे. परंतु, गुरुवारी टँकजवळ चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्त करण्यात आला. त्याच्याकडून कुठे गळती होत नाही ना, यावर लक्ष ठेवले जात आहे. त्याबरोबर टेक्निशियन आल्याशिवाय गुरुवारी टँकरमधून टँकमध्ये ऑक्सिजन भरला गेला नाही. एक नव्हे, तर दोन टेक्निशियन उपस्थितीत आवश्यक तपासणी झाल्यानंतरच ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आला.
पाच टन ऑक्सिजनची बचत
घाटीत ऑक्सिजनसाठी समिती आहे, पथक आहे. प्रशिक्षित टँकरचालक असल्यासंदर्भात ते लक्ष ठेवत आहेत. घाटीत ऑक्सिजनची मागणी आता पाच टनांनी कमी झाली आहे. ‘एनआयव्ही’ऐवजी बायपॅप वापरण्यावर भर दिला जात आहे. यातून १० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन जातो. ‘एनआयव्ही’तून हेच प्रमाण ४० लिटर प्रतिमिनिट अथवा त्यावर असते, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी दिली.
--------
फोटो ओळ..
१) मेडिसीन विभागाच्या परिसरातील ऑक्सिजन टँकच्या देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
२) दोन टेक्निशियनच्या देखरेखीत टँकमध्ये ऑक्सिजन भरताना टँकरचालक.