औरंगाबाद : कोरोना आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशानुसार शासनाने दिवाळीत फटाके विक्रीवर निर्बंध आणल्यामुळे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात फटाके विक्रीवर आलेले संकट बुधवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत थोड्याफार प्रमाणात टळले.
लवादाच्या आदेशानुसार फटाके विक्रीवर राज्यात बंधन आले असून, त्यासाठी काही निकष लावले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात थेट फटाक्यांवर बंदी आणताना सर्व बाबींचा विचार केला आहे. हरित फटाके कोणते आहेत, त्याचे वर्गीकरण तज्ज्ञ करणार आहेत. याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता बैठकीला होते. ग्रीन फटाक्यांना लवादाने परवानगी दिली आहे. हवेचे प्रदूषण वाढणार नाही, याबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
कोरोनाला पोषक वातावरण होईल, असे करू नकाखूप फटाके फुटले तर खूप त्रास होईल. जास्त प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा विचार करून नागरिकांनी फटाके फोडावेत. कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच प्रदूषणात वाढ होऊन श्वसनाचे आजार बळावतील, इतकेही फटाके नागरिकांनी फोडू नयेत, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
काळजी घ्यावीमनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी आवाहन केले आहे, इको फ्रेंडली फटाके विक्रीस परवानगी असेल. हवेत जास्त प्रदूषण करणाऱ्या फटाके विक्रीस बंदी असेल. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुले, ज्येष्ठांना त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी.