औरंगाबाद : नवा मोंढा, जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर दगडाने ठेचून खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. सुरेवाडी) असे मयताचे नाव आहे. मयत सोनवणे हे गेले काही दिवस कोणासोबत राहत होते. घटनेच्या रात्री त्यांचे कुणासोबत भांडण झाले होते का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, जाधववाडी येथील व्यापारी संकुलाच्या छतावर दादाराव यांची अज्ञात मारेकऱ्यांनी सिमेंट गट्टूने डोके ठेचून त्यांचा खून केल्याचे शुक्रवारी (दि. २१) रोजी सकाळी उघडकीस आले होते. याप्रकरणी सरकारतर्फे सिडको ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध फौजदार बुधा शिंदे यांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि कर्मचाऱ्यांनी मयताची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या चेहऱ्याचे छायाचित्र काढले आणि समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. मयत यांच्या उजव्या हातावर डीएसएस असे इंग्रजीत आणि ॐ असे अक्षर गोंदलेले असल्याचे सांगितले होते.
या वर्णनासह लोकमतने शनिवारी बातमी प्रकाशित केली. तेव्हा त्यांच्या साडभाऊ आणि मुलाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना प्रेताचे छायाचित्र आणि प्रत्यक्ष दाखविले तेव्हा त्यांनी हंबरडा फोडून ते दादाराव सोनवणे असल्याचे सांगितले. मयताचे शवविछेदन झाले होते. यामुळे शनिवारी सकाळी पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिला. सोनवणे हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. दारूचे व्यसन असल्यामुळे ते सतत नातेवाइकांशी भांडण करीत आणि निघून जात. तीन ते चार दिवस घरी परतत नव्हते. सहा ते सात दिवसांपूर्वी घरी भांडण करून सोनवणे हे घराबाहेर पडले होते. ते परत येतील म्हणून नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला नव्हता. त्यांचा खून झाल्याचे समजल्याने नातेवाइकांना धक्काच बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, २२ वर्षीय मुलगा आणि १२ वीमध्ये शिकत असलेली मुलगी असा परिवार आहे.