औरंगाबाद : स्वसंवाद व भावनेचे व्यवस्थापन ही क्रीडा क्षेत्रात यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत क्रीडा मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. शुभांगी दातार यांनी स. भु. महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत व्यक्त केले.डॉ. शुभांगी दातार यांनी उपजतच असलेल्या व परिस्थितीनुसार दिसून येणाऱ्या चार व्यक्तिमत्त्व छटांची माहिती दिली. याची नेमकी ओळख उपस्थित खेळाडूंना समजण्यासाठी त्यांच्याच सहभागाने लघु नाट्याद्वारे सादरीकरण करून घेतले. हे सर्व सांगताना त्यांनी मेहनत आणि सराव यातला नेमका फरक उलगडून सांगितला, तसेच लहान खेळाडूंना समजणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी कुंगफू पांडा, भाग मिल्खा भाग या चित्रपटातील क्लिपिंगचा वापरदेखील केला. या सर्व गोष्टींचा खेळासोबतच आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो, हे सांगून स्वसंवादाचा प्रभावीपणे कसा वापर करून घेता येतो हे पटवून दिले. त्याचप्रमाणे कामगिरी उंचावणे आणि ध्येय निश्चितीचे स्वरूप व त्यासाठी पूरक कल्पना कशी असावी, याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, या कार्यशाळेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे, जिम्नॅस्टिक खेळाचे प्रशिक्षक सागर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी स. भु. शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अरुण मेढेकर, सुधाकर पोहनेरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, उपप्राचार्य अलकनंदा दोडके, क्षमा खोब्रागडे, दीपक कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विशाल देशपांडे यांनी केले. डॉ. पूनम राठोड यांनी आभार मानले. या कार्यशाळेला विविध खेळांतील १६३ खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.
स्वसंवाद व भावनेचे व्यवस्थापन ही क्रीडा क्षेत्रात यशाची गुरुकिल्ली : शुभांगी दातार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:44 PM