औरंगाबाद : विधि शाखेचे प्रथम वर्ष आणि प्री-लॉ ची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. नितीन सांबरे यांनी बुधवारी फेटाळली.
मा.प. विधि महाविद्यालयातील सराव परीक्षेतील प्रश्न आणि विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या विधि परीक्षेतील प्रश्नांमध्ये साम्य आढळले होते. दोन्ही परीक्षांमधील प्रश्नांमध्ये साधर्म्य आढळल्याने वाद सुरूझाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार, एलएलबीच्या प्रथम वर्ष आणि प्री लॉ च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी काही विषयांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, कॉन्ट्रॅक्ट या विषयाची पुन्हा परीक्षा ५ एप्रिल रोजी, तर मायक्रो इकॉनॉमिक्स विषयाची परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
विद्यापीठाच्या निर्णयाला मराठवाडा लॉ कृती समितीच्या वतीने खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली, तर याप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालानंतरच पारदर्शकतेचे पाऊल उचलत विद्यापीठाने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणणे विद्यापीठातर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडले. सुनावणीअंती खंडपीठाने फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी काम पाहिले.