औरंगाबाद : पेट्रोल व डिझेलच्या सतत भाववाढीने शंभरी गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मागील २४ दिवसांपासून दर स्थिर असल्याने वाहनधारकांना अंशतः दिलासा मिळाला आहे.
मागील महिन्यात तब्बल १४ दिवस दर वाढला होता. पेट्रोल ९८.७१, तर डिझेल ८९.७४ रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचले होते, तर पॉवर पेट्रोल शंभरी ओलांडून १०२.१७ रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचले होते. हे दर आजपर्यंतचा उच्चांक ठरले आहेत. पेट्रोलचा दर १०० रुपयांपर्यंत जाणार, अशी मानसिकता वाहनधारकांनी करून ठेवली होती. मात्र, अचानक पेट्रोलियम कंपन्यांनी भावावाढीला ब्रेक लावला. एक- दोन दिवस नव्हे तर आता २४ दिवस झाले पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर आहेत.
यासंदर्भात पेट्रोलपंप चालकांनी सांगितले की, इंधन भावावाढीने सरकारवर टीका होऊ लागली. त्यात ५ राज्यांत निवडणुका जाहीर झाल्याने तेथील निकालावर परिणाम होऊ नये म्हणून दर स्थिर ठेवण्यात आले, असे वाटते. यापूर्वी बिहारमधील निवडणुकांच्या काळातही पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर ठेवण्यात आले होते, असे पेट्रोल पंप संघटनेचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.