औरंगाबाद : ‘नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल’ असे (No Corona vaccine No Petrol ) आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याचे पालन काटेकोरपणे होत आहे का, याच्या पाहणीसाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंप येथे पाहणी केली. मात्र लसीकरण केल्याची कोणतीही खात्री न करता येथील कर्मचारी वाहनधारकांना पेट्रोल देत असल्याचे आढळून आले. यामुळे या पेट्रोल पंपाला रविवारी रात्री ८.३० वाजता प्रशासनातर्फे सील करण्यात आले. (petrol pump sealed due to violating the corona vaccine rules)
जिल्ह्यात लसीकरणास मिळत असलेल्या कमी प्रतिसादाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढीसाठी उपाययोजना सुरू केली. ज्या वाहनधारकांनी लस घेतली असेल, त्यांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले होते. गॅस एजन्सी, स्वस्त धान्य दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समितीलाही हाच नियम लागू होता. मात्र, पेट्रोल पंपावर या आदेशाचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी बाबा पेट्रोल पंपाची पाहणी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे, जिल्हा पुरवठा निरीक्षक राजेंद्र शिंदे यांनी पेट्रोल पंप सील केला. याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना लसीकरणासंदर्भात विचारणा होताना पाहण्यास मिळाली.
विचारणा केली की, नागरिक येतात अंगावर धावूनलसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवा असे म्हणणे सोडाच; मास्क लावा असे म्हटले तरी काही वाहनधारक आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. आम्हाला कोणतेही संरक्षण नाही, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे कसे पालन करणार, असा सवाल पेट्रोलपंप चालकांनी उपस्थित केला.