साहेबराव हिवराळे
औरंगाबाद: कोरोनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची जबाबदारी पेलताना फार हाल झाले. त्यातच आता इंधन दरवाढीने प्रत्येक वस्तूचा भाव वाढविल्याने अडचणीत भरच पडली आहे. विमानातील इंधन साठ रुपये लिटर तर वाहनातील पेट्रोल १०९ रुपये लिटर झाल्याने वाहन चालविणे अवघड झाले आहे.
अनलाॅक झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी कामगारांच्या हातची कामे गेली. काम शोधण्याची धावपळ वाढली. त्यातच मुलांच्या शाळेचा खर्च देखील वाढला आहे. वाहनाने फिरणे अधिक खर्चीक झाले आहे. इंधन दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. शहरात १२ लाख २ हजार ९२७ दुचाकी असून, एक लाख ४९९ मोटारकार तर २९ हजार ३२२ इतक्या जीप आहेत. शहरात ३८ पेट्रोल पंप असून नागरिकांना दररोज अडीच लाख लिटर पेट्रोल आणि एक लाख लिटर डिझेल लागते. आर्थिक टंचाई असतानाच इंधन दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
........
पगार कमी, खर्चात वाढ
-हातचे काम गेल्यामुळे मिळेल ते काम करावे लागते. कारखान्यातील पगार कमी झाल्यामुळे निमूटपणे रडत पडत घराचा गाडा ओढण्यासाठी कसरत करावी लागते. कामावर जाताना स्वतःची गाडी घरी ठेवून दुसऱ्याच्या गाडीची लिफ्ट घेत कंपनी गाठावी लागते.
- सलीम बेग, वाहनचालक.
पेट्रोलवर अधिक खर्च
वाहन चालवताना इंधन दरवाढीने डोकेदुखी वाढली आहे. घरापासून कामावर जाण्याचे ठिकाण लांब असल्यामुळे परवडत नसले तरी वेळेच्या आत जाण्यासाठी वाहनाचा उपयोग करावा लागतो. मिळणाऱ्या पगारातून अधिक खर्च पेट्रोलवरच होत असल्याने आर्थिक अडचण होते.
-सुनील नवतुरे
धोरणामुळे खर्चात भर : पाचशेच्या ठिकाणी हजार...
- पूर्वी पाचशे रुपयांत आठवडाभराचा भाजीपाला येत होता, त्याला आता एक हजार रुपये लागतात.
- किराणा साहित्य देखील महाग झाले आहे. यासाठीदेखील अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
- पेट्रोल दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तूंवर झाला असून, प्रत्येक वस्तूच्या किमतीत जबर वाढ झाली आहे.
हा बघा फरक....
विमानातील इंधन (प्रति लिटर)
६० रुपये
पेट्रोल
१०९ रुपये
शहरातील पेट्रोल पंप
३८
रोज लागणारे पेट्रोल
२ लाख ५० हजार लिटर
शहरातील वाहने
१२ लाख २ हजार ९२७ दुचाकी
१ लाख २९ हजार ८२१ चारचाकी