वाळूज महानगर: कामगारांचा पीएफ थकविल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसीतील श्रेया लाईफ सायन्सेस या कंपनी मालकांसह एका ठेकेदाराविरुध्द शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील श्रेया लाईफ सायन्सेस प्रा.लि. मध्ये काम करणाऱ्या ९५ कामगारांची जुलै २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीतील ३७ लाख ४४ हजार ४८० पीएफची रक्कम भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे भरलेली नाही. हा प्रकार भविष्य निधी कार्यालयातील अधिकाºयांच्या लक्षात आल्यानंतर ६ सप्टेंबर कंपनीला लेखी नोटीस बजावली होती.
यानंतर कंपनीकडून सुजितकुमार सिंग व शिलकुमार सिंग (दोघेही रा. मुंबई) यांना जबाबदारी देण्यात आल्याचे सांगत त्यांना कंपनीकडून पीएफचा भरणा करणे बाबत लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कंपनीकडून या रकमेचा भरणा न केमुळे भविष्यनिधी कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी मुक्तेश्वर व्यास यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन कंपनीचे मालक सुजितकुमार सिंग व शिलकुमार सिंग यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील निल आॅटो प्रा.लि. या कंपनीला जुबेर एंटरप्रायजेस या एजन्सीमार्फत कंत्राटी कामगार पुरविले जातात. कामगार कैलास लांडे याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार केली होती. यानंतर भविष्य निधी कार्यालयाकडून कंपनी व ठेकेदारांची चौकशी केली असता कैलास लांडे याचा एक वर्षाचा पीएफ भरला नसल्याचे अधिकाºयांच्या लक्षात आले. ठेकेदार साहेबलाल शेख कंपनीकडून कामगारांच्या पीएफचे पैसे घेऊन भविष्य निधी कार्यालयाकडे जमा केले नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी साहेबलाल शेख याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-----------------------------------