औरंगाबाद : औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेश नोंदणीसाठी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरूच आहे. प्रवेश नोंदणीसाठी १२ नोव्हेंबरपर्यंत असलेली मुदत आता पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत वाढल्याने ‘बी. फार्मसी’, ‘फार्म. डी’, ‘डी. फार्मसी’चे प्रवेश लांबले आहेत. विद्यार्थी, पालकांचे प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाकडे डोळे लागले आहेत.
राज्यात ‘बी. फार्मसी’, ‘फार्म. डी’ प्रवेशासाठी ५८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मराठवाड्यात २७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘डी. फार्मसी’साठी नोंदणी केली असून, विद्यार्थी प्रवेश फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. फार्मसी काैन्सिल ऑफ इंडियाकडून नव्या काॅलेजच्या पडताळणी, महाविद्यालयांच्या जागा कमी केलेल्या महाविद्यालयांच्या अपिलावर निर्णय न झाल्याने औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली असून, २ डिसेंबर रोजी अंतरीम गुणवत्ता यादी जाहीर होऊन ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी ७ डिसेंबर रोजी जाहीर होईल. मात्र, पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसल्याने या वर्षाअखेर प्रवेश होतील का, अशी शंका विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
‘डी फार्मसी’च्या नोंदणीलाही मुदतवाढ‘डिप्लोमा इन फार्मसी’ (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या मराठवाड्यातील १०४ महाविद्यालयांत ६ हजार ५४० प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत २६ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, अजून ३१ ऑक्टोबरपर्यंत असलेली मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान आक्षेप नोंदविता येतील. अंतिम गुणवत्ता यादी २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.