औरंगाबाद : पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट-२) दुसरा पेपर ऑनलाईन पद्धतीने; परंतु केंद्रावर न घेता तो पहिल्या पेपरप्रमाणे कोठूनही देता यावा, असा शुक्रवारी निर्णय झाल्यानंतर शनिवारी लगेच विद्यापीठाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. १३ मार्च रोजी ‘पेट-२’ चा पेपर होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यासंदर्भात कळविले आहे की, ‘पेट-२’साठी ६ हजार ३८३ विद्यार्थी पात्र असून, या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थींच्या लॉगीनमध्ये ८ मार्च रोजी फोटोसह त्यांचे परीक्षा ओळखपत्र प्रसिद्ध केले जाणार आहे. ४५ विषयांसाठी येत्या शनिवारी १३ मार्च रोजी एकाच दिवशी सकाळी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी १०० प्रश्न व १०० गुण असतील व ९० मिनिटांचा वेळ राहील. १७ मार्च रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘पेट-१’ आणि ‘पेट-२’ या दोन्ही परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनवर २० मार्च रोजी उत्तीर्ण प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात येणार आहे. या ‘पेट’ची वैधता एक वर्षासाठी राहणार आहे.
‘पेट’ उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, आदी) उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान करता येईल. ८ एप्रिल रोजी या उमेदवारांना आवश्यक ती कागदपत्रे (हार्ड कॉपी) पीएच.डी. सेलकडे सादर करावी लागणार आहेत. पीएच.डी.साठी विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.