लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पारंपरिक वेशभूषा साकारून पारंपरिक वाद्यांच्या तालावर भांगडा, गिद्दा, जिंदवा या पंजाबी लोकनृत्यांसह सादर झालेल्या लोकगीतांच्या माध्यमातून सोमवारी (दि.१६) पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडले. निमित्त होते औरंगाबाद शीख संघातर्फे (संगत) आयोजित केलेल्या ‘बैसाखी-दी-रात’ या कार्यक्रमाचे.बैसाखी सणानिमित्त शहरातील संत तुकाराम नाट्यगृहात सोमवारी रात्री हा रंगारंग आणि पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सरदार जयमलसिंग रंधावा, अमरजितसिंग सैनी, गुरुद्वारा ‘श्री गुरु तेगबहादूर लंगर साहेब’चे अध्यक्ष रणजितसिंग गुलाटी, अवतारसिंग सोढी, हरविंदरसिंग सलुजा, हरदेवसिंग मुच्छल, गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभाचे अध्यक्ष हरविंदरसिंग बिंद्रा, भाईदयासिंग गुरुद्वाराचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, मनमोहनसिंग ओबेरॉय आदींची उपस्थिती होती.पंजाबी युनिव्हर्सिटी पटियाला (पंजाब)च्या युवा कल्याण विभागातील विजय यमला, गगनजितसिंग यांच्यासह २६ कलावंतांंच्या पथकातर्फे ‘बैसाखी-दी-रात’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर क रण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आज दिन बैसाखी दा लोको’ या गीताने झाली. यानंतर ‘सद्गुरूनानक तेरी लीला न्यारी है’ हे गीत सादर झाले. ढोल, तुंबी (एकतारा), मडके अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर होणाऱ्या लोकगीतांनी उपस्थित मंत्रमुग्ध होऊन गेले. गीतांच्या सादरीकरणानंतर प्रारंभी जिंदवा हे लोकनृत्य सादर करण्यात आले. यावेळी युवक-युवतींनी सादर केलेल्या कलाविष्काराने कार्यक्रमात रंगत आली. कलावंतांनी भांगडा नृत्य सादर करून कार्यक्रमात अनोखी ऊर्जा भरली. यावेळी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होत होता. प्रारंभी सरदार जयमलसिंग रंधावा यांनी मनोगत व्यक्त केले. समाजबांधवांनी एकत्रित येण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. येणाºया पिढीसाठी असे कार्यक्रम यापुढेही आयोजित करण्यात येईल, असे ते म्हणाले.
पंजाबी लोकनृत्यांतून संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:38 AM