औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे नवनवीन युक्त्या शोधून काढतात. शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला आपले क्रेडिट कार्ड ‘केवायसी’ केलेले नाही, त्यामुळे खात्यातून साडेनऊ हजार रुपये कट होतील, असे फोनवर सांगितले. त्यानंतर ‘केवायसी अपडेट’साठी ‘लिंक’ पाठवली. त्या लिंकवर गेल्यानंतर माजी नगरसेवकाने माझ्याकडे दोन क्रेडिट कार्ड आहेत. त्यापैकी कोणत्या कार्डची ‘केवायसी’ करायची, अशी विचारणा केल्यानंतर सायबर भामट्याने थेट शिविगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक दिग्विजय शेरखाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना एका मोबाईलवर १० सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून १२ मिनिटांनी एक फोन आला. त्यावर समोरील व्यक्तींने एसबीआय क्रेडिट बँकेतून बोलत असून, आपली ई - केवायसी झालेली नाही. तुमच्या बँक खात्यातून ९ हजार ४७५ रुपये कट होतील, असे सांगितले. यावर शेरखाने यांनी ‘ई - केवायशी’ कसे करायचे, असे विचारले. त्यावर साबयर भामट्याने तत्काळ मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे बँकेची लिंक पाठवत फोन सुरू ठेवून ‘केवायसी’ करा, असे सांगितले. या लिंकवर शेरखाने यांनी क्लिक केले. मात्र, फोन कट झाला. यानंतर पुन्हा भामट्याचा फोन आला. तेव्हा त्यास शेरखाने यांनी माझे नेट सुरू होत नसून, एसबीआय बँकेचे दोन क्रेडिट कार्ड आहेत कोणत्या कार्डची ‘ई - केवायसी’ करायची ते सांगा, असे विचारले. तेव्हा आपले बिंग फुटल्याचे स्पष्ट झाल्यामुळे समोरील भामट्याने त्यांना शिविगाळ करीत फोन बंद केला. यानंतर शेरखाने यांनी त्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो मोबाईल बंद होता. इतरही नागरिक फसले जातील म्हणून त्यांनी ठाण्यात तक्रार नोंदवली.
अनोळखी फोनला प्रतिसाद देऊ नकाआपल्या मोबाईलवर अनोळखी नंबरहून आलेले मेसेज, फोनला कोणीही प्रतिसाद देऊ नये. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. कोणतीही बँक मोबाईलवरून ‘केवायसी’सह इतर कागदपत्र मागत नाही. त्यामुळे आपली फसवणूक टाळण्यासाठी अनोळखींना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले. कोणाची फसवणूक झालीच तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.