औरंगाबाद : बीए आणि बी.एस्सी प्रथम वर्षाच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला. मुलांच्या हाॅल तिकिटावर मुलींचे छायाचित्र येण्याचा प्रकार एका दिवसापूर्वी समोर आला होता. मात्र, परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली असून, हाॅल तिकीटाविषयी त्याची कोणतीही अडचण येऊ न देता ‘पीआरएन नंबर’वर परीक्षा घेण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी सांगितले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध शाखांच्या परीक्षा यापूर्वीच सुरू होत्या. त्यानंतर मंगळवारपासून बीए आणि बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात झाली. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पेपरच्या एक दिवसआधी हॉल तिकीट मिळाले. त्यात विद्यार्थिनींच्या हॉल तिकिटावर अनिवार्य इंग्रजी विषयाचा उल्लेख करण्यात आलेला नाही तर काही मुलांच्या हॉल तिकीटावर मुलींची छायाचित्रे आहेत. या प्रकारामुळे आपल्याला पेपर देता येईल की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत होती. परंतु, ‘पीआरएन नंबर’वर परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. बीएला ७१,४०२ विद्यार्थी, तर बी.एस्सी.ला ६,२९७ विद्यार्थी बसले आहेत. यासाठी २४० परीक्षा केंद्रे आहेत.