औरंगाबाद : हर्सुल कारागृहातून सुनावणीसाठी न्यायालयात आणलेल्या आरोपीचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास पोलिसांनी थांबवले. तेव्हा त्या युवकाने पोलिसांसोबत अरेरावी करीत त्यांचीच कॉलर पकडल्याची घटना शुक्रवारी १० जून रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात घडली. या युवकाच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अफसर खान सत्तार खान (२०, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस मुख्यालयातील सहायक फाैजदार सुभाष भोसले यांच्यावर न्यायालयात आरोपी घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. शुक्रवारी ते साईनाथ अटाेळे, अनिल मराठे, दीपक राठोड यांच्यासोबत हर्सुल कारागृहात गेले. सुनावणी असल्याने त्यांनी कारागृहातून आरोपी मुकेश सुखबीर लाहोट, संतोष प्रभाकर नरवडे आणि शेख अफरोज शेख गुलाब यांना ताब्यात घेत ११.३० वाजता न्यायालयात हजर केले. त्यानंतर ते आरोपींना घेऊन न्यायालयात कामकाजानिमित्त बसले होते. दुपारी ३ वाजता अफसर खान हा तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने आरोपींचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यास भोसले यांनी हटकले.
छायाचित्र काढण्याची परवानगी विचारली असता, त्याने येथे कोण कशाला परवानगी घेईल, असे उलट उत्तर देत आरडाओरड सुरू केली. त्यानंतर पोलिसांची कॉलर पकडून त्याने हुज्जत घातली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेताच, तोपर्यंत त्याने मोबाईल तत्काळ मित्राकडे दिला. पोलिसांनी त्याला अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार अफसर खान यास वेदांतनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याठिकाणी त्याच्या विरोधात शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा नोंदवत अटक केली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक सुधाकर पाटील करीत आहेत.