औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात धारदार शस्त्र घेऊन फिरणार्या, मोर्चेकर्यांच्या खिशावर डल्ला मारणार्या ४ पाकीटमारांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. आरोपींनी चोरलेली पाकिटे, रोख रक्कम तसेच एटीएम कार्ड जप्त करून सिटीचौक, बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
बीड, औरंगाबाद, जालना व इतर ठिकाणांहून पाकीटमाराच्या किमान चार ते पाच टोळ्या मोर्चात घुसल्याचा अंदाज पाकीटमारांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्तविला. क्रांतीचौकातूनच चोरट्यांनी हातसफाई सुरू केली. गर्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने या खिसेकापूंना हेरून ठेवले. आरोपी सतीश प्रकाश नवगिरे (२३, रा. आंबेडकरनगर) हा पॅन्टच्या खिशात चाकू ठेवताना सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके यांना दिसला. दिल्लीगेटजवळ त्याला बाजूला घेत अटक केली. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई विलास वाघ, सुनील धात्रक, गजानन मांटे, विशाल सोनवणे यांच्या पथकाने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत खिसे कापणार्या टोळीतील चौघांना पकडण्यात आले. पोलिसांनी या अट्टल पाकीटमारांच्या ताब्यातून पाकिटे, विविध बँकांचे एटीएम कार्ड, मोबाईल व १८ हजारांची रोख रक्कम, असा ऐवज जप्त केला. पवारांचे भाषण सुरू असताना टोळीने चार जणांची पाकिटे मारली. रोख रक्कम व मोबाईल, असा एकूण २८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. या चोरट्यांनी पुणे महापालिकेचे नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे आणि भय्यासाहेब जाधव हे क्रांतीचौकात शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रतीकात्मक देखावा सादर करीत असताना महेंद्र पठारे यांनी शर्ट काढून कारमध्ये ठेवला होता. तेव्हा कारची काच उघडून पाकीट चोरले़. तसेच अंभोरा, जि. जालना येथील सय्यद कदीर यांचे पाकीट चोरीला गेले़
भोकरदनचे माजी आ. चंद्रकांत दानवे हे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी निघाले असता त्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दानवे हे वेळीच सावध झाल्याने त्यांचे पाकीट वाचले़ दानवे यांनी नेत्यांना पाकिटे सांभाळा चोरटे खिशात हात घालत आहेत, असे सांगितले होते. पाकिटे लंपास करणार्या टोळीतील शताब्दीनगरातील मंगेश रमेश तुपे (१९), मिसारवाडीतील प्रमोद उमेश प्रधान (२१), बाळू भागाजी मकळे (२२) आणि प्रमोद दालचंद भुजे (१८) या चौघांना ताब्यात घेतले. बाळू मकळे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याचा विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.