पिंप्री राजा : पिंप्री राजा ते डायगव्हाण या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात येत आहे. सदरील काम करताना भरपावसाळ्यात रस्ता खोदण्यात आला आहे. तर दुसरीकडे शेतात खोदकाम करुन तेथील मातीचा यासाठी वापर केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
पिंप्री राजा-डायगव्हाण या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मजबुतीकरण व रुंदीकरण केले जात आहे. पण संबंधित ठेकेदाराने हे काम ऐन भर पावसाळ्यात सुरू केले आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणाºया शेतकºयाची गैरसोय होत आहे.
रस्ता रुंदीकरण करून त्यात मातीचा भराव टाकण्यासाठी ठेकेदाराने बाजूच्याच शेतात दोन्ही बाजूने मोठी नाली केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या मालांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कनिष्ठ अभियंता निंभोरे म्हणाले की, रस्त्याची हद्द ही ५० फुटांची आहे. पण आम्ही शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार आहोत.