ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी वडाच्या झाडाची पूजा करतात हे तर आपल्याला माहितच असेल. पण औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.
औरंगाबादजवळील एका पत्नी पीडित आश्रमात पुरुषांकडून दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील ७ जन्म काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको असं म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालत पूजन केलं. औरंगाबादच्या वाळूज परिसरात ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली.
पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींकडून प्रातनिधिक निषेध या अनोख्या पद्धतीनं व्यक्त करण्यात येतो. "ज्यावेळी आम्ही आशेनं लग्न केलं की आपली पत्नी आपल्याला सांभाळून घेईल. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा भांडणं सुरू होतात आणि ते थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचतं तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. आम्ही समाजातून बाहेर फेकले जातो आणि वेगळ्या दृष्टीकोनातून आमच्याकडे पाहिलं जाऊ लागतं. पत्नी एकतर आमच्याकडे नांदत नाही आणि नांदली तरी ती सुखाने जगू देत नाही", अशी व्यथा एका पत्नी पीडित पतीनं यावेळी मांडली.
राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हे व्रत सौभाग्यासाठी असून या दिवशी वट वृक्षाची पूजा केली जाते. बंगालमध्ये हेच व्रत याच दिवशी वडाची पूजा न करता पतीची पूजा करून साजरे केले जाते. पतील चंदनाची उटी आणि हार घालून साजरा करतात. या दिवशी यमदेवाची पूजा करून, फळांचा नैवेद्य दाखवून त्याला वडाची फांदी अर्पण करतात.
वट पौर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो व मुन्जाला साकडे घालतो कि "हे मुंजा आम्हाला अश्या भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्या पेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव. खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले व ते कायदे बनवताना पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली गेली नाही व त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अ बला झाला आहे, असं पत्नी पीडित पुरुष सांगतात.