खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची पाईप फोडून त्यात विषारी द्रव्य टाकल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीतर्फे खुलताबाद पोलीसात तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील खांडीपिंपळगाव गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. आज यातून काही ग्रामस्थांना विषारी द्रव्य मिश्रित पाणीपुरवठा झाला. पाण्याच्या उग्र वास येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली. यावरून फुलाबाई भावसिंग जोनवाल, पांडूरंग जयाजी भालेराव व इतर दोन ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हा प्रकार गंभीर असल्याने सरपंच सुरेखा अशोक उबाळे, ग्रामसेवक आर.डी.जाधव यांनी खुलताबाद पोलीसात याबाबत तक्रार दिली. ग्रामसेवक जाधव म्हणाले की,पाणीपुरवठा योजनेच्या गळतीमधून विषारी द्रव्य सोडले आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.