वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी येथे शुक्रवारी (दि.२३) दुपारी पाण्याची खाजगी पाईप लाईन फुटून शकडो लिटर पाणी वाया गेल्याने पाण्याची नासाडी झाली.
मुख्य रस्त्यावरील कान्होपात्रा चौका जवळून शिवाजीनगर भागातील रहिवाशांनी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरुन पाण्याचे खाजगी कनेक्शन घेतले आहे. जमिनीखालून कनेक्शन न घेता अर्धवट उघडा आहे. या रस्त्यावर कायम वाहनाची ये-जा सुरु असते. अज्ञात चारचाकी वाहनाचे चाक उघड्या पाईपवरुन गेल्याने पाण्याचा पाईप फुटला. शुक्रवारी पाण्याचा दिवस असल्याने दुपारी ३ वाजेच्या सुमारास नळाला पाणी सुटले.
त्यामुळे फुटलेल्या पाईपमधून पाणी गळतीला सुरुवात झाली. पाण्याचा प्रवाह जास्तीचा असल्याने अर्धवट तुटलेला पाईप जास्त फुटला. त्यामुळे पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहायला सुरुवात झाली. संबंधित पाईप मालकाला याची माहिती नसल्याने जवळपास अर्धा ते पाऊणतास पाणी पाईपमधून रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला दोन-तीन ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. ही बाब लक्षात येताच संबंधिताने पाईप दुरुस्त करुन पाणी गळती थांबविली. दरम्यान शेकडो लिटर पाणी वाहून गेल्याने या भागातील अनेक रहिवाशांना पाणी मिळाले नाही.