औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन प्रकाशराव अंदुरेचा मित्र व दोन साल्यांना एटीएस व सीबीआयने मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. आरोपींकडे सापडलेले पिस्टल व जिवंत काडतुसे फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविल्याची माहिती सूत्राने दिली .
मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सापडलेले पिस्टल व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडलेल्या पिस्टलमध्ये साम्य असल्याची शंका असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सचिनच्या साला (पत्नीचा भाऊ) शुभम सुरळे यास सीबीआय पथकाने ताब्यात घेतल्यावर पिस्टल काही दिवसापूर्वीच त्याच्याकडे होते, ही बाब पोलिसांना समजली. सचिन अंदुरे याने १५ दिवसांपूर्वीच शुभमकडे पिस्टल सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते; परंतु सचिनला अटक झाल्यावर त्याने ते त्याचा चुलत भाऊ अजिंक्य सुरळे याच्याकडे लपविण्यास दिले. अजिंक्यनेही त्याचा नुकताच नव्याने झालेला मित्र रोहित रेंगे याच्याकडे दिले व ते रोहितने धावणी मोहल्ला येथील त्याच्या घराच्या माळ््यावर लपवून ठेवले होते.
सीबीआय पथकाने शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे, रोहित रेंगेला ताब्यात घेतले. रेंगेच्या घराची झडती घेतली असता, काळ्या रंगाचे गावठी पिस्टल, मॅगजीनसह, तीन जिवंत काडतुसे (७.६५ मि.मी. बोअर), एक पॉकेट प्लास्टिक बॅग, एक कुकरी, काळ्या रंगाचे एअर पिस्टल, दोन मोबाईल, तलवार, असे साहित्य पथकाने जप्त केले आहे.मंगळवारी दिवसभर त्यांची चौकशी करून मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात सीबीआयचे उपअधीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी तिन्ही आरोपींना सुटीच्या न्यायालयासमोर दाखल केले असता सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शस्त्र बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक शैलजा जानकर तपास करीत आहेत.सध्या सीबीआयचे पथक औरंगाबादेतच तळ ठोकून आहे. सचिन अंदुरे व त्याच्या संपर्कातील संशयित व्यक्तीवर पथकाने लक्ष केंद्रित केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारीही या प्रकरणाचे धागेदोरे शोधत आहेत.