वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अपघात रोखण्यासाठी वाहतुक शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून शनिवारपासून खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत परिसरातील मुख्य चौकातील रस्ते खडी व डांबर टाकुन बुजविण्यात आले.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रमूख चौक तसेच औरंगाबाद- नगर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने कायमच लहान- मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी अंधारात वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळेही वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक क्षेत्रात शहर व ग्रामीण भागातुन मोठ्या प्रमाणात कामगार, उद्योजक व व्यवसायिक रोजच ये- जा करत असतात. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अपघात सत्र थांबविण्यासाठी वाळूज वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक ताहेर पटेल आदींनी पुढाकार घेतला आहे.
शनिवारी तिरंगा चौक, ए.एस.क्लब, महावीर चौक व बजाज विहार आदी भागातील मोठाले खड्डे खडी व डांबर टाकुन बुजविण्यात आले. नगररोडवरील खड्डे बुजविण्यासाठी तसेच वाहतुक सिग्नलवर पांढरे पट्टे मारण्यासाठी के. टी. संगम कन्स्टक्शन कंपनीकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे निरीक्षक उदार यांनी सांगितले.