गल्ले बोरगाव : तीनच महिन्यांपूर्वी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पळसवाडी येथील उड्डाणपुलावर कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे भगदाड पडले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाकडून खड्डा बुजविण्यात आला. ते भगदाड बुजवून आठ दिवस होत नाही तोच पुन्हा उड्डाणपुलावर आणखी एक नवीन खड्डा पडला आहे. परिणामी हा खड्डादेखील अपघाताला निमंत्रण देत असून महामार्ग बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
कन्नडकडून औरंगाबादकडे जाताना उड्डाणपुलावर हा मोठा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी शिरल्यामुळे तो खड्डा आणखी मोठा होत आहे. एकीकडे मोठा खड्डा पडूनदेखील जडवाहतूक सुरूच आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी या पुलाची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा रस्ता बंद करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती युवराज ठेंगडे, चेअरमन नारायण बर्डे, सरपंच भेंडे, संजय फुलारे, किशोर जाधव, धनराज जोनवाल, कैलास म्हसरुप यांनी दिला आहे.
-----
पुलाचे बांधकाम बोगस झाल्याचा आरोेप
पळसवाडी शिवारात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी उड्डाणपुलावरील पाणी वाहत जाऊन थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे पुलावरील पाण्याचे नियोजन करण्यात आले नाही. वेळोवेळी जागोजागी खड्डे पडू लागले आहेत. उड्डाणपूलाची नव्याने बांधण्यात आलेली संरक्षण भिंत देखील धोकादायक झाली आहे. संरक्षक भिंतीजवळ खड्डे पडले आहेत. भिंतीला बसविण्यात आलेल्या सिमेंट प्लेट्स बाहेरच्या बाजूला झुकल्या आहेत. त्यामुळे कधीही दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाचे कामच बोगस झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
----