औरंगाबाद : महापालिकेने २०१५ ते २०२० या पाच वर्षांत राज्यशासनाकडून मिळालेल्या २७७ कोटींचा चुराडा शहरातील रस्त्यांवर केला. तरीही स्मार्ट सिटी खड्डेमुक्त होऊ शकलेली नाही. नवीन आणि जुन्या शहरात फेरफटका मारला, तर रस्त्यांची काय अवस्था आहे, ते लक्षात येते.
महापालिकेला तीन टप्प्यांत २७७ कोटी रुपये मिळाले. यात २०१५ साली २५ कोटी, त्यानंतर पुढील दोन वर्षांत १०० कोटी व अलीकडच्या काळात १५२ कोटी रुपये मिळाले. यातून बहुतांश रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रीटीकरणातून करण्यात आली. या रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणचे क्युरिंंग व्यवस्थित झालेले नाही. रस्त्यांवर तडे गेले आहेत. काही कामे अर्धवट पडलेली आहेत. रस्त्यातील विजेचे खांबही काढलेले नाहीत, तर दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. यावरून वाहन चालवितांना नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
टाऊन हॉल परिसरातील रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. पालिकेचे मुख्यालय हाकेच्या अंतरावर असताना तेथील रस्ते खराब झाले आहेत.
दिवाणदेवडीतील रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. अंगुरीबाग, मोतीकारंजा, कैसरकॉलनी, दमडी महल ते चंपाचौक, कटकट गेट, मदनीचौक या भागांतील रस्त्यांवरून वाहन चालविणे कठीण झाले आहे.
सिडको उड्डाणपुलाखालील रस्ता खराब झाला आहे. क्रांतीचौक पुलालगतचा रस्ता खोदला. मात्र, तो दुरूस्त केलेला नाही. सिडको बसस्थानक ते हर्सूल हा रस्ता बांधकाम विभागाकडे आहे. त्याची पूर्णत: चाळण झाली आहे.