छत्रपती संभाजीनगर : बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या तुषार किसन करपे (२३, रा. विरमगाव, फुलंब्री) हा मंगळवारी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. बुधवारी रात्री गुन्हे शाखेने त्याचा शोध घेत त्याला फुलंब्री तालुक्यातून पुन्हा ताब्यात घेतले.
२२ वर्षीय तरुणीने तुषार विरोधात बलात्कार, ॲट्रॉसिटीची तक्रार केली होती. सोमवारी वेदांतनगर पोलिसांनी त्याला गावातून अटक केली. मंगळवारी न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सायंकाळी ५:३० वाजता अंमलदार प्रकाश नागरे, चालक अर्जुनसिंग जारवाल हे त्याला मेडिकल तपासणीसाठी घाटी रुग्णालयात घेऊन जात होते. तेव्हा लघुशंकेचे नाटक केलेल्या तुषारने अयोध्या मैदानाजवळून हातकडीसह पोबारा केला.
रात्रभर शेतात झोपलापोलिसांच्या तावडीतून पळाल्याने तुषार घाबरला होता. कर्णपुरा परिसरातील शेतातून पळत राहिला. रस्त्यावर गेल्यास पोलिस पकडतील या भीतीने तेथेच झोपला. त्यामुळे त्याला बऱ्याच जखमा झाल्या. पहाटे रुमालाने हातकडी झाकून लिफ्ट मागत फुलंब्री गाठले. तो गावाकडेच गेल्याच्या दाट संशयातून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, सहायक फौजदार सतीश जाधव, संजय गावंडे, बाळू नागरे हे त्याच्या मागावर हाेते. सायंकाळी विरमगाव फुलंब्री रस्त्यावरच बोडखे यांनी त्याला पकडून पुन्हा अटक केली.