लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संपत्तीच्या वादातून नातेवाईकांनी वडिलांचा खून केल्याची बतावणी करणारा फिर्यादी मुलगाच जन्मदात्याचा खुनी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे २८ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या खूनप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली.ज्ञानेश्वर काशीनाथ वाघमारे (४२, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.जालना जिल्ह्यातील जमीन विक्री करण्यास वडिलांचा विरोध असल्याने त्याने त्यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने वडिलांना मारहाण केल्यानंतर ते बेशुध्दावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याने पोलीसांना जबाब देताना सांगितले की, संपत्तीच्या वादातून नातेवाईकांनी वडिलांना मारहाण केली. यानंतर ज्ञानेश्वरने नातेवाईक परमेश्वर दोंडगे, हरिभाऊ शिंदे, सतू शिंदे आणि संजीवनी यांच्याविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात फिर्याद नोंदविली.उपचारादरम्यान काशीनाथ यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचे कलम लावून तक्रारदार यांनी नावे दिलेल्या संशयितांची विचारपूस केली. अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. शिवाय घटना जेथे झाली तेथील शेजाºयांचा पोलिसांनी जबाब नोंदविला. तेव्हा मारहाणीची कोणतीही घटना तेथे झाली नसल्याचे लोकांनी सांगितले. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे व सहायक निरीक्षक राहुल खटावकर यांनी दिली.
फिर्यादी मुलगाच निघाला जन्मदात्याचा खुनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:16 AM