छत्रपती संभाजीनगर : अजिंठा-वेरूळ या जागतिक वारसाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा येथे आहे. तो टिकविण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
हे शहर राज्याची पर्यटन राजधानी म्हणून पुढे येण्यासाठी ‘पर्यटन’ केंद्रस्थानी ठेवून डेव्हलपमेंट प्लॅन (विकास आराखडा) तयार करणे आवश्यक आहे . ३० वर्षे झाले येथील डीपी प्लॅन तयार झाला नाही. यामुळे शहराचा कासवगतीने विकास होत आहे. राजस्थानप्रमाणे येथेही पर्यटन संस्कृती रुजण्यासाठी लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली. संघटनेच्या ‘क्रीडा महोत्सव’निमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरासह विविध विषयांवर ‘लोकमत’शी चर्चा केली.
प्रश्न : पर्यटन वाढीसाठी काय करावे?उत्तर : आपण विदेशात जेव्हा जातो तेव्हा तेथे मागील काही वर्षांत बांधलेले मोठी प्राणीसंग्रहालये, खास प्रदर्शन सेंटर याद्वारे ते पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरात प्राचीन वारसा आहे. तोच टिकवून ठेवणे व त्याचे मार्केटिंग करण्याची गरज आहे. यासाठी डीपी प्लॅनमध्ये पर्यटनाच्यादृष्टीने पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक असो वा चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून पर्यटक, प्रवासी हॉटेलात आला की, त्यास प्रथमदर्शनी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे दिसली पाहिजेत, अशा प्रतिकृती तयार कराव्यात. त्या पर्यटनाचे क्यूआर कोड लावावेत. ते स्कॅन करून पर्यटकाला तेथील सर्व माहिती उपलब्ध होईल. ‘फर्स्ट इम्प्रेशन ईज लास्ट इम्प्रेशन’ यास म्हणतात. तेथून तो पर्यटक शहराच्या प्रेमात पडेल व सर्व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी मुक्काम वाढवेल.
प्रश्न : पर्यटनाची राजधानी, भविष्यातील स्मार्ट सिटी ताळमेळ कसा बसेल?उत्तर : स्मार्ट सिटी म्हणजे गगनचुंबी इमारती असा अर्थ नाही. मुंबईत गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या; पण त्यामुळे जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नाही. पर्यटनाची राजधानी व स्मार्ट सिटीचा ताळमेळ बसविण्यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या वास्तुशैलीची झलक तुम्हाला स्मार्ट सिटीमध्येसुद्धा दिसली पाहिजे. बिबीका मकबरा परिसरात रहिवासी वस्तीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली उंच इमारती उभारल्या व त्यास बाहेरून काचेचे तावदाने लावणे, हे शोभा देणार नाही. येथील ऐतिहासिक वारसाची जाणीव पर्यटकांना पदोपदी दिसली पाहिजे.
प्रश्न : जिल्ह्याचे अर्थचक्र पर्यटनाभोवती का फिरत नाही?उत्तर : गोवा राज्याचे अर्थचक्र फक्त पर्यटनाभोवती फिरते. येथे समुद्र सोडला तर जायकवाडी धरण, गोदावरी नदीपासून ते अजिंठा-वेरूळ, देवगिरी किल्ला, बिबीका मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ गार्डन, नैसर्गिक, धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था पर्यटनाभोवती का फिरत नाही. कारण, त्यादृष्टीने गंभीर विचारमंथन झालेच नाही. त्या विचारमंथनातून पर्यटन संस्कृती निर्माण झाली नाही. कागदावरील ‘अतिथी देवो भव:’ हे शहरवासीयांच्या मनामनांत रुजले तर देशी-विदेशी पर्यटक या शहराकडे आकर्षित होतील.