औरंगाबाद: चौका-चौकात नाकाबंदी असताना पोलिसांची नजर चुकवून शहरात कारमधून आणलेला ३८ बॉक्स दारूसाठा गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने बुधवारी सकाळी उस्मानपुरा येथे पकडला. या कारवाईत मद्यतस्कर विनोद प्रेमचंद महतोले (३२, रा. पीरबाजार) यास पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, लॉकडाऊन कालावधीत चोरट्या मार्गाने दोन ते चार पट अधिक दराने मद्य विक्री केली जाते. ही बाब लक्षात घेऊन आरोपी महतोले हा शहरात दारूचा साठा आणणार असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे , हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, तात्याराव शिनगारे यांच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास संशयित कार उस्मानपुरा येथील एका हॉटेलसमोर पोलिसांनी अडविली. कारमध्ये महतोले होता. पोलिसांनी पंचासमक्ष कारची झडती घेतली असता, जालना येथून कारमध्ये लपवून आणलेले देशी दारूचे ३७ बॉक्स आणि विदेशी दारूचा एक बॉक्स अशी सुमारे १ लाख ७० हजाराची दारू पोलिसांना आढळली. आरोपीचा मोबाईल आणि ५ लाखाची कार असा सुमारे पावणे सात लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत आरोपी महतोलेविरुध्द उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.
लॉकडाऊन कालावधीत कमाईचा बेतलॉकडाऊन कालावधीत अधिकृत दारू दुकाने बंद असतात. या कालावधीत मद्यपी मिळेल त्या दराने दारू खरेदी करतात. ही बाब हेरून आरोपीने जालना येथून दारूसाठा मिळवून आणला. तो हा साठा घरात लपवून ठेवून विक्री करणार होता. त्याचे घर अवघ्या काही अंतरावर असताना पोलिसांनी त्याला पकडले.