औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वीच आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदचे उद््घाटन झाले. याच धर्तीवर आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पॅथींचे इन्स्टिट्यूट उभे करण्याचे नियोजन आहे. औरंगाबादसारख्या शहरात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयासाठी प्रस्ताव आला, तर सकारात्मक विचार केला जाईल. सोबत रिसर्च इन्स्टिट्यूट देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.
एका कार्यक्रमानिमित्त श्रीपाद नाईक हे गुरुवारी शहरात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आयुष मंत्रालयाने प्रत्येक राज्यात एकतरी इन्स्टिट्यूट करण्याची व्यवस्था केली आहे. त्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन केले. योगाप्रमाणे वेगवेगळ्या पॅथी परदेशांमध्ये पोहोचल्या पाहिजेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एक एक पॅथींचे डॉक्टर असावेत. त्यासाठी निधी दिला जात आहे. आयुष प्रणालीत भारतीय चिकित्सामध्ये सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे. होमिओपॅथीचा जन्म जर्मनीत झाला; परंतु भारतात त्याचा अधिक प्रसार झाला. त्यामुळे भारत सरकारने अन्य चिकित्सा प्रणालीबरोबर त्यास मान्यता दिली. ८० देशांमध्ये होमिओपॅथीचा अभ्यास केला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होमिओपॅथीच्या विकासासाठी भारताची महत्त्वाची भूमिका असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.