औरंगाबाद : आगामी काळात देशात ‘स्मार्ट सिटी’ उभारण्यासाठी नियोजनाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक डॉ. सुब्रता दास यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागांंतर्गत ‘श्रीनिवास रामानुजन जिओस्पेशिअल चेअर’च्या वतीने शुक्रवार, दि.१९ सप्टेंबरपासून दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. दास यांच्या हस्ते झाले. ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. यावेळी कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, ‘निलीट’चे संचालक डॉ. रंजन माहेश्वरी, रामानुजन चेअरचे संचालक डॉ. एस.सी. मेहरोत्रा, विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख, अद्वैत औंधकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुब्रता दास बीजभाषणात म्हणाले की, देशामध्ये चंदीगड, ग्रेटर नोएडा ही आदर्श शहरे म्हणून ओळखली जातात. नियोजनबद्ध वसविण्यात आलेली शहरे म्हणून त्यांची ओळख आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. परिणामी, शहराच्या विस्तारीकरणात नियोजन नसल्यामुळे बेशिस्त घरे, झोपडपट्ट्या, पाणी, रस्ते, गटारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. लोकांकडे मोबाईल, टीव्ही, वातानुकूलित गाड्यांसह सर्व सुविधा आल्या. लोकांनी तंत्रज्ञानामार्फत होत असलेले बदल स्वीकारले; पण लोकांना या बदलाचा ‘सिव्हिक सेन्स’ नसल्यामुळे नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागामार्फत ‘रिमोट सेन्सिंग’संदर्भात यापुढे प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन केले जाणार आहे. ‘जिओ स्पेशिअल’ या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य असून या क्षेत्रात संशोधन करण्याची विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. त्यांनी ‘अॅप्लिकेशन आॅफ रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस फॉर टाऊन प्लॅनिंग’ या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना नियोजनबद्ध शहरांच्या विकासाची संकल्पना समजावून सांगितली. यावेळी डॉ. माहेश्वरी, कुलसचिव डॉ. माने, डॉ. काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मेहरोत्रा यांनी केले. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. रत्नदीप देशमुख यांनी दिली. डॉ. मुक्ता धोपश्वरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. भारती गवळी यांनी आभार मानले. उद्या डेहराडून येथील ‘आयआयआरएस’चे संचालक डॉ. वाय.व्ही. कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
‘स्मार्ट सिटी’साठी नियोजनाची गरज...
By admin | Published: September 20, 2014 12:17 AM