औरंगाबाद : सेंद्रिय बोंडअळीमुळे मागच्या वर्षी झालेले मोठे नुकसान पाहता यंदा पुरेशा पावसानंतरच कपाशीची लागवड करा, तरच बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळता येईल, असा सल्ला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, मोहीम अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, यंदा मुबलक पावसाचा अंदाज आहे. बळीराजाने पुरेशा पावसानंतरच कापसाची पेरणी करावी. कृषी विभागाने खरिपाची जय्यत तयारी केलेली आहे. यावर्षी बियाणांची पुरेशी उपलब्धता असल्याने कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
बागायती कपाशीमध्ये ७० ते ९० टक्क्यांपर्यंत किडींचा प्रादुर्भाव झाला होता. कपाशीची लागवड उशिरा झाल्याने बागायतीच्या तुलनेत कोरडवाहू कपाशीत किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे २०१६-१७ च्या हंगामात आढळून आले आहे. मान्सून सुरू झाल्याबरोबर सुप्तावस्थेतून बाहेर पडलेल्या पतंगास कापूस पिकाची फुलोरा अवस्था न सापडल्यास अंडीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या मरून जातात व या किडीची संख्या हंगामात कमी होण्यास मदत होते. म्हणून या किडीस हुल देण्यासाठी हंगामातील मान्सूनचे आगमन झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकेल, अशी माहिती उदय चौधरी यांनी दिली.
बियाणांच्या पाकिटासोबत बोंडअळी व्यवस्थापनासाठी उपाययोजनांचे हॅण्डबिल संबंधित बियाणे कंपनीने विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांस उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या. यावेळी कृषी साहित्य विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सोनी, सर्व बियाणे, खते कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेत्यांची उपस्थिती होती.
खरीप हंगाम नियोजन - जिल्ह्यात ७ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित आहे. - कपाशीचे क्षेत्र ७.५ टक्क्यांनी घटणार आहे. - कपाशीऐवजी मका, तूर व इतर कडधान्य पिके, ऊस, कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. - बी. टी. कापूस बियाण्यांचे १८ लाख ८६ हजार पाकिटे उपलब्ध.- मक्याचे ३१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध. - ८२,००० मे.टन खतांचा साठा उपलब्ध.- बागायती कापसाची लागवड जूनच्या मध्यावधीस करावी.